राजकीय पोस्टरला अभय; छोट्या व्यावसायिकांवर गुन्हे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात अनधिकृत पोस्टर आणि बॅनरवरील कारवाईवेळी विजेचा धक्का लागून महापालिकेच्या एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. हा एक बळी गेल्यानंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाच्या अंमलबजावणीतही अधिकार्‍यांनी राजकीय पक्षांच्या ‘पोस्टर बॉईज’ना अभय देत केवळ छोट्या व्यावसायिकांच्या पोस्टर आणि बॅनरविरोधात गुन्हे दाखल केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २४) उघडकीस आला.
महापालिकेच्या झोन क्र. ५ मधील अतिक्रमण निरीक्षक प्राप्ती जाधव यांनी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका हॉटेलमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वच्छता जवान शंकर चव्हाण यांना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वेणूताई चव्हाण रोडवरील ओंकार गॅस एजन्सीजवळ अनधिकृत बॅनर लावलेले दिसून आले. त्यांनी ही माहिती जाधव यांना कळविली. त्यानंतर जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली. महापालिकेची परवानगी न घेता, अनधिकृत बॅनर लावून महापालिकेच्या जाहिरात कराचे आर्थिक नुकसान केले आणि शहराचे विद्रुपीकरण केले, असे जाधव यांनी सांगितले. शहरातील छोट्या व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.